रविवार, १ जानेवारी, २०१७

नाव :- रोशन किसनराव गजभिये

पत्ता :- संजय गांधी नगर नं.१ सिद्धार्थ क्रिडा मंडळ जवळ, अमरावती.

भ्रमणध्वनी :- ९९७०१४३३१८, ८२३७६३१७२२.

शिक्षण :-  बी. कॉम.

व्यवसाय :- मोबाईल एक्सेसरीज & रिपेयरिंग शॉप.

प्रकाशित पुस्तके :-  हृदयातले तराणे (कविता- गज़ल संग्रह)

उल्लेखनिय कार्य :- अंकुर साहित्य संघ (अमरावती) तर्फे आयोजित कवि संमेलन व अखिल भारतीय शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा) च्या गज़ल मुशायरा कार्यक्रमात सहभाग.


गझल -
१)

तुझे ते चित्र मी हृदयात माझ्या छापले होते.
तरी तू नेमके काळीज माझे कापले होते.

किती मी पाहिली स्वप्ने तुझा दिलदार व्हावे. पण,
लळा लावून कोणाला कुणी का आपले होते?

हमेशा राहिलो रे पारखा मी या प्रकाशाला,
मला कारण तसे त्या काजव्यांनी श्रापले होते.

उपाशी पोट होते पण उपाशी झोपलो नाही,
तव्यावर कल्पनांच्या चंद्र, तारे थापले होते.

इथे मी कर्जबाजारी, मुलींचे लग्नही नाही,
मघाशी या विचारांनीच बाबा तापले होते.

'मला हा देश प्यारा' च्या बढ़ाया मारती सारे,
तुला हा देश प्यारा मग तरी का घापले होते?

वृत्त - वियद्गंगा, मात्रा - २८

लगावली - लगागागा ।लगागागा ।लगागागा । लगागागा

२)
नेत जा बाबा मला कामावरी,
एकटीला वाटते भीती घरी.

बघ सुने घर भासते तुझियाविना,
सोडुनी जाताच आम्हा सासरी.

एवढा झाला कसा लाचार तू?
का उगा करतोस त्यांची चाकरी?

सूर अपुले वेगळे लावू नका,
एकतेची वाजवा रे बासरी.

वाढतो अन्याय येथे रोजचा,
होवुनी तू वीर लढ आतातरी.

आजही दलितांस त्यांनी मारले,
करत असता भिम जयंती साजरी.

चटक बर्गर अन् पिझाची लागता,
गोड मग लागेल कैसी भाकरी?

ठेव ना आई मला पदरात ह्या,
हीच काशी, हीच माझी पंढरी.

वृत्त - मालिबाला, मात्रा - १९
लगावली - गालगागा ।गालगागा ।गालगा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: